पुणे: वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांची यादी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार ९१३ ठिकाणी सातत्याने कचरा टाकला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील १६१ ठिकाणांवरील कचरा टाकणे बंद झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये, यासाठी महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी सातत्याने कचरा टाकणाऱ्या ठिकाणांची माहिती संकलित करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सुरू करण्यात आले होते. त्यानुसार शहरात ९१३ ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याचे पुढे आले होते.

हेही वाचा… देशी खाद्यतेल उद्योग अडचणीत; बेसुमार खाद्यतेल आयातीमुळे तेलबियांचे गाळप ५० टक्क्यांवर

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्वेक्षण करून ही यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये वारजे, औंध, हडपसर आणि नगर रस्ता परिसरातील सर्वाधिक जास्त ठिकाणांचा समावेश असल्याने या ठिकाणांकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच कचरा टाकला जाऊ नये, यासाठी या ठिकाणी रांगोळी काढणे, जनजागृती करणे असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसादही मिळत असून, १६१ ठिकाणांवर कचरा टाकणे बंद झाल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला आहे.

नगर रस्ता- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १३१, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३७, ढोले पाटील रस्ता २४, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात ६३ कचरा टाकली जाणारी ठिकाणे आहेत. शिवाजीनगर-घोल रस्ता येथे ४०, कोथरूड-बावधन येथे ४, धनकवडी-सहकारनगर येथे ३६, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ९८ ठिकाणांचा समावेश आहे. तर वारजे-कर्वेनगर येथे ४३, हडपसर-मुंढवा हद्दीत १५३, कोंढवा-येवलेवाडी येथे ८७ तर वानवडी-रामटेकडीक क्षेत्रीय कार्यलायाच्या हद्दीत ४९ ठिकाणे आहेत. मध्यवर्ती भागातील कसबा-विश्रामबागवाडा आणि भवानी पेठे येथे अनुक्रमे ५९ आणि २१ तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४४ ठिकाणे आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The garbage is being thrown at 913 places continuously in pune print news apk 13 dvr
First published on: 09-01-2024 at 11:24 IST