करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील जवळपास अडीच महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा झाली नव्हती. महापालिका अधिनियम कायद्यानुसार तीन महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत सर्वसाधारण सभा पार पडली. महपौर मुरलीधर मोहोळसह सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सभागृहात येण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ केले तसेच स्क्रीनिंग देखील करून घेतल्याचे दिसून आले.
यावेळी महापालिकेत येणार्या प्रत्येक नगरसेवक, अधिकारी वर्गाला हातावर सॅनिटायझर देत, स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच सभागृहात प्रत्येक नगरसेवक करिता सोशल डिस्टंन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी शहराच्या सद्यस्थितीवर प्रशासन कसं काम करत आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र महापौरांना आपण मोठ्यासंख्येने एकत्र जमलो आहोत, करनोा संसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सांगत सध्या चर्चा करण्यास नकार दिला. तसेच, क्षेत्राय कार्यालयातील उपआयुक्त दर्जाचा अधिकारी तुम्हाला माहिती देईल, असे सांगितले. यावर विरोधक आक्रमक झाले. परंतु, यानंतर मतदान घेत सभा तहकुब करण्यात आली.
राज्यात करोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही महत्वाची शहरं करोनाबाधितांच्या संख्येबाबत आघाडीवर आहेत. शिवाय येथील अनेकांना करोनामुळे जीव देखील गमावावा लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन संपूर्ण दक्षता घेत आहे.