पुणे : ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडल्यामुळे सर्वच पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खरिपात उत्पादकतेत घट होण्याची भीती  आहे. बाजरीच्या उत्पादनात सर्वाधिक ३१ तर भाताच्या उत्पादनात चार टक्के घटीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरीप हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र १४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर आहे. यंदा सात सप्टेंबरअखेर १४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत.

गेल्यावर्षी भाताची उत्पादकता २२२०.६६ किलो प्रतिहेक्टर होती, ती यंदा चार टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. बाजरी पिकांची उत्पादकता १०९०.७३ किलो प्रतिहेक्टर होती. ती यंदा ७५७.६२ किलोंवर येण्याची म्हणजे ३१ टक्क्यांनी उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. खरीप ज्वारीत सहा टक्के, नाचणीत ११ टक्के, मक्याची २५ टक्के, तुरीची १८ टक्के, मुगाची ३३ टक्के, भुईमुगाची १२ टक्के, सोयाबीनची १२ टक्के आणि कापसाच्या उत्पादकतेत १३ टक्के घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पावसाचा जोर ओसरला

मध्य प्रदेशावर असलेली वाऱ्याची चक्रीय स्थिती राजस्थानकडे सरकल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याखेरीज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस मेघगर्जनेह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोट मोसमी पाऊस उशिरा सक्रिय झाला. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात काहीशी घट झाली आहे. शेतकरी आता रब्बी हंगामातील ज्वारीची तयारी करतील. ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येणार आहे. – विकास पाटील, संचालक, कृषी विभाग