देशातील गृहनिर्माण बाजारपेठेत पुण्याचा वाटा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेचा विस्तार हा देशातील काही महानगरांना लाजविणारा आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) नगरी अशी पुण्याची ओळख आहे. आता बँकिंग, विमा आणि वित्तीय सेवा क्षेत्रांतील जागतिक पातळीवरील बड्या कंपन्या पुण्यात कार्यालये थाटत आहेत. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधीही तरुणांना उपलब्ध होत आहेत आणि त्यातून शहरात स्थलांतरही वाढत आहे. आयटीसह इतर आघाडीच्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या मनुष्यबळाकडून सुरुवातीपासून घरांना मागणी मोठी होती. करोना संकटानंतर सर्वांनाच मोठ्या घराचे महत्त्व कळले. त्या काळात महिनोन् महिने घरात काढावे लागल्याने प्रशस्त घरांकडे ओढा वाढू लागला. त्यामुळे करोना संकटानंतर पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेत मागणी वाढू लागली.
गेल्या काही वर्षांत आयटी कंपन्या असलेला हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क परिसर या भागांत घरांना मागणी जास्त होती. करोना संकटानंतर सुरू असलेली गृहनिर्माण क्षेत्रातील तेजीची मालिका आता संपुष्टात येऊ लागली आहे. आयटी क्षेत्राला लागलेली घरघर हे त्यामागे प्रमुख कारण. आयटी क्षेत्रावर रोजगारकपातीची टांगती तलवार कायम आहे. अनेक मोठ्या कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांची कपात करीत आहेत. त्यातच कृत्रिम प्रज्ञेच्या वापरामुळे असंख्य रोजगार अतिरिक्त ठरत आहे. त्यातून रोजगार कपातीचे चित्र आणखी भीषण बनू लागले आहे. याचेच चित्र पर्यायाने पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेतील घसरणीच्या रूपाने दिसून येत आहे.
यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्के घट झाल्याचे अनारॉकचा अहवाल सांगतो. क्रेडाई पुणे मेट्रोच्या ताज्या अहवालानुसार, यंदा पहिल्या सहामाहीत पुण्यात घरांची सरासरी किंमत ७५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. घरांच्या एकूण विक्रीत ४५ लाख रुपयांवरील घरांचा वाटा ५५ टक्क्यांवरून कमी होऊन ३५ टक्क्यांवर आला आहे. त्याचबरोबर ७० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा वाटा ८५ वरून ६० टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी ७० लाख ते २ कोटी रुपयांच्या घरांची मागणी गेल्या चार वर्षांत तिपटीने वाढली आहे. तसेच, १ कोटीहून अधिक किमतीच्या घरांच्या मागणीत गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे.
परडवणारी घरे देणार कशी?
‘क्रेडाई’च्या अहवालाचा विचार करावयाचा झाल्यास परवडणाऱ्या म्हणजेच ४५ लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा वाटा एकूण विक्रीत घटत आहे. याच वेळी घरांच्या किमतीत गेल्या तीन वर्षांत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामागे वाढता बांधकाम खर्च, जमिनीच्या किमतीत झालेली मोठी वाढ ही कारणे आहेत. त्यामुळे विकासकाला एखादा प्रकल्प उभारून त्यात परवडणाऱ्या दरात घरे देणे शक्य होत नाही. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या ग्राहकांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्याला घर घ्यायचे आहे, पण ते परवडत नाही आणि विकासकाला जमिनीच्या किमतीमुळे शहराच्या हद्दीत ते देणे शक्य नाही, अशी विचित्र अवस्था सध्या पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेची झाली आहे.
sanjay.jadhav@expressindia.com