पुणे : चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामामुळे वाढलेले हवा प्रदूषण, नाल्यांतून थेट नदीत सांडपाणी मिसळत असल्याने होणारे जलप्रदूषण यावर ठोस पावले उचलण्याची मागणी उद्योगांच्या वतीने शासकीय यंत्रणांसमोर करण्यात आली. याचबरोबर पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी योगदान देण्याची भूमिकाही उद्योगांच्या प्रतिनिधींनी घेतली.

‘फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज’च्या वतीने चाकणमधील पर्यावरणाशी निगडित समस्यांवर चर्चा करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांबरोबर नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कांत यांच्यासह चाकणमधील सुमारे ७० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत फेडरेशनचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी चाकणमधील पायाभूत सुविधांसह प्रदूषणाची समस्या मांडली. ते म्हणाले, ‘चाकण परिसरातील ओढे नदीला येऊन मिळतात आणि या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवावेत. नदीतील जलपर्णी काढण्यासाठी यंत्राची आवश्यकता आहे. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून धूळ पसरली आहे. हे प्रदूषण थांबवण्यासाठी फॉगर यंत्राची आवश्यकता आहे. प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यात व इतरत्र फेकलेल्या असतात. हे थांबविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिक बाटल्या नष्ट करणारी यंत्रे बसविण्यात यावीत.’

‘चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी केवळ एक कंपनी चाकण नगर परिषदेच्या हद्दीत आहे. इतर सर्व कंपन्या परिसरातील १९ ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळे या कंपन्यांतून चाकण नगर परिषदेला काहीच उत्पन्न मिळत नाही. परंतु या कंपन्यांमधील कामगार आणि अधिकारी चाकण परिसरात वास्तव्यास असल्याने नागरीकरण वाढले आहे. यातून पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते आदी पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. निधीअभावी ही कामे करण्यात चाकण नगर परिषदेला मर्यादा येत असल्याने कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून या समस्या सोडविण्यासाठी पुढे यावे,’ अशी भूमिकाही बैठकीत मांडण्यात आली. घातक कचरा विल्हेवाटीसाठी आणखी कंपन्यांना परवानगी देण्याचीही मागणी बैठकीत करण्यात आली.

वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे समस्या निर्माण होत आहेत. त्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. याचबरोबर समस्या निर्माणच होऊ नये, यासाठीही काम करणे आवश्यक आहे. आम्ही या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. – जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ