पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतील मुलाखतीविना निवडीअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात मराठी माध्यमासाठी ९६३, उर्दू माध्यमासाठी १००, हिंदी माध्यमासाठी ३५, बंगाली माध्यमासाठीच्या १६ उमेदवारांचा समावेश आहे.
शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पवित्र संकेतस्थळामार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीविना निवडीचा पर्याय निवडलेल्या १८ जिल्हा परिषदांनी ४६८, १३ महापालिकांनी ३६२, ५७ नगरपालिका-नगर परिषदांनी २२१, तर २५ खासगी शैक्षणिक संस्थांनी ५३७ अशा एकूण १५८८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली होती. त्यानुसार पात्रताधारक उमेदवारांचे निवडयादीकडे लक्ष लागले होते.
या पार्श्वभूमीवर, मुलाखतीविना निवडीअंतर्गत १५८८ रिक्त पदांसाठी एकूण १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात पहिली ते चौथीसाठी ५५४, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी २१६, अकरावी ते बारावीसाठी १३४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात अनुसूचित जातीतील ३५, अनुसूचित जमातीतील ६४, विमुक्त जातीतील (अ) ३७, भटक्या जमातीतील (ब) २६, भटक्या जमातातील (क) २२, भटक्या जमातीतील (ड) १४, विशेष मागास प्रवर्गातील ६, इतर मागास प्रवर्गातील १६८, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १०७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील १३३, खुल्या प्रवर्गातील ४०२ उमेदवारांचा समावेश आहे.
मुलाखतीसह निवडीसाठी ८ हजार ७३३ पदे
मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्येही भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार ८ हजार ७३३ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.