लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या फेरीत सुमारे २५ हजार ९७३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, विशेष फेरीत पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर आता विशेष फेऱ्या राबवल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या विशेष फेरीसाठी २८ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी पहिल्या दहा पसंतीक्रमानुसार २५ हजार ९७३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. त्यात १९ हजार ६८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंतीक्रमानुसार ३ हजार ४२४ विद्यार्थ्यांना, तर तिसऱ्या पसंतीक्रमानुसार १ हजार २१७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले.

हेही वाचा… धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञान शाखेसाठी १४ हजार १३४ तर वाणिज्य शाखेसाठी ९ हजार ४७ विद्यार्थी आणि कला शाखेसाठी २ हजार १५४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विशेष फेरीत कला शाखेचा खुल्या गटासाठी सर्वाधिक पात्रता गुण ४६८ तर विज्ञान शाखेसाठीचे पात्रता गुण ४६४ आहेत. दोन्ही शाखांसाठी फर्ग्युसन महाविद्यालयाला पसंती मिळाली आहे. तर वाणिज्य शाखेचा सिम्बायोसिस महाविद्यालयात पात्रतागुण सर्वाधिक ४४७ आहेत. तिसऱ्या फेरीच्या तुलनेत विशेष फेरीच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.