पुणे : शहरातील रस्ते झाडण्यासाठी काढण्यात आलेल्या १४७ कोटींच्या निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आता झाडकामाची पुन्हा निविदा काढण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या निविदेसाठी येत्या गुरुवारी (१२ जूनला) महापालिकेच्या पूर्वगणनपत्रक समितीची बैठक होणार आहे.
शहरातील रस्ते झाडण्यासाठी एकाच वेळी महापालिका प्रशासनाने १४ क्षेत्रीय कार्यालयांसाठी निविदा काढल्या होत्या. झाडण कामाच्या निविदा काढताना पूर्वीच्या नियम व अटींमध्ये बदल करण्यात आला होता. ठराविक ठेकेदार यामध्ये कसे पात्र होतील, हे लक्षात घेऊन याच्या अटी अंतिम केल्या होत्या. निविदा जाहीर होण्याच्या आधीच सर्व प्रमाणपत्र तयार असणे व स्पायडर मशीन खरेदी केलेली असणे आवश्यक आहे, ही अट अनिवार्य ठेवली होती.
महापालिकेने घातलेल्या या अटी व शर्तींची ज्या ठेकेदारांना पूर्वीच माहिती आहे, त्यांनाच ही कामे मिळणार आहेत, असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी केला होता. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी महापालिकेत बैठक घेतली. त्यानंतर या निविदेत रिंग झाल्याच्या आरोपात प्राथमिक तथ्य आढळल्याने पृथ्वीराज यांनी त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे दिला होता.
याबाबतचा गोपनीय अहवाल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना सादर केला होता. त्यानंतर हा अहवाल आयुक्तांनी स्वीकारून निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार झाडणकामाची नव्याने निविदा काढण्यासाठी गुरुवारी पूर्वगणनपत्रक समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर तातडीने निविदा काढण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.