पुणे : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षाचे नाव निश्चित झाले असून येत्या आठवडाभरात नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमामुळे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली होती.भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची तीन वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे तसेच माजी आमदार मेधा कुलकर्णी या नावांची चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी कोण सक्षम आहे, याची चाचपणी प्रभारींकडून मे महिन्यात करण्यात आली होती. शहरातील आठही विधानसभा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुखांबरोबर त्यादृष्टीने चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार नावाची निश्चिती झाली असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर पक्षातील सर्वच पदांवर नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी प्रदेशची कार्यकारिणीही जाहीर झाली. त्यानंतर निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले. या दरम्यान मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे प्रदेश भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नियुक्ती जाहीर केल्यास त्यांना शहर आणि जिल्हा कार्यकारिणी जाहीर करावी लागेल आणि त्याचा परिणाम नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर होईल, या शक्यतेने नियुक्ती लांबणीवर पडली होती.

हेही वाचा >>>टोमॅटोचे दर आणखी वाढणार; महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून खरेदीचा केंद्र सरकारचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराध्यक्ष नियुक्त करताना भाजपने काही निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार, आमदार पदावर असलेल्यांना, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या इच्छुकांना आणि विद्यमान अध्यक्ष यापैकी कोणाचीही निवड न करण्याचे निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा नवा शहराध्यक्ष कोण असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून पक्षाच्या वर्तुळातही त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.