पुणे : राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २२ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नियमित शुल्कासह ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

एनएमएमएस परीक्षेतून शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांची मुले या परीक्षेसाठी पात्र असतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येते. बौद्धिक क्षमता चाचणी, शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा परीक्षेत समावेश असतो. विद्यार्थ्यांना आठ माध्यमातून परीक्षा देता येते.

हेही वाचा >>>दिवाळीआधी हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे- भोपाळ दररोज थेट विमानसेवा तर इंदोर, चेन्नई अन् रायपूरसाठीही उड्डाण 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ४ नोव्हेंबरपर्यंत, विलंब शुल्कासह ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान, तर अतिविलंब शुल्कासह १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया http://www.mscepune.in आणि http://mscenmms.in या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. २२ डिसेंबरला राज्यभरात ही परीक्षा होणार आहे. तर परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.