पुणे : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू केलेले पूर्वतयारी अभ्यासक्रम निधीअभावी बंद पडल्याचे समोर आले आहे. २०१६ पासून ‘यूजीसी’कडून अभ्यासक्रम चालवण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. तसेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानग्याही देण्यात आल्या नाहीत.

केंद्राचे समन्वयक डॉ. एस. फजल फिरदौसी यांनी ही माहिती दिली. विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ (यूपीएसी) आणि ‘राज्य लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढावा म्हणून ‘यूजीसी’तर्फे ‘एन्ट्री इन्टू सर्व्हिसेस’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून केंद्रातील ‘यूजीसी यूपीएसी, एमपीएससी’ हे अभ्यासक्रम चालवण्यात येत होते. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नागरी सेवा परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अकरा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जायचे.

वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मासिक भत्ता, शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि अभ्यासिका अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जायच्या.‘यूजीसी’च्या निकषांनुसार अनुसूचित जाती २०, अनुसूचित जमाती १०, इतर मागासवर्गीय ९, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ५, अल्पसंख्याक आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ४ जागा असे आरक्षण अभ्यासक्रमांना देण्यात येत होते.

स्पर्धा-परीक्षांची तयारी करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी करणे, प्रशासनातील त्यांचा टक्का वाढणे या उद्देशाने हे अभ्यासक्रम चालवण्यात येत होते.डॉ. फिरदोसी म्हणाले, ‘‘यूजीसी’च्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. केंद्रातील दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर प्रशासनात काम करत आहेत. त्यात ‘युजीसी’च्या अभ्यासक्रमांचा वाटा मोठा आहे. मात्र, ‘यूजीसी’कडून केंद्राला कोणतीही पूर्वकल्पना न देता अभ्यासक्रम बंद करण्यात आले. याबाबत पाठपुरावा केला असता योग्य प्रतिसाद देण्यात आला नाही, अभ्यासक्रम बंद केले नसून, आढावा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारात विद्यार्थ्यांच्या नुकसान झाले आहे.’

दरम्यान, पुणे महापालिकेच्या माध्यमातून चालवला जाणारा अभ्यासक्रम सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार पाठपुरावा करूनही यूजीसीकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानग्या देण्यात आल्या नाहीत. २०१६ पासून ‘यूजीसी’कडून अभ्यासक्रम चालवण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. केवळ निधी उपलब्ध करून देण्याचे पत्र पाठवण्यात येत होते. गेल्या वर्षी तसे पत्र न मिळाल्याने केंद्रातील अभ्यासक्रम बंद करावे लागले. – डॉ. एस. फजल फिरदौसी, केंद्राचे समन्वयक