पुणे : ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कस्पटे कुटुंबीयांना धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी नीलेश चव्हाण, तसेच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे,’ अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
चव्हाण आणि हगवणे यांना पुणे आयुक्तालयातून शस्त्र परवाना देण्यात आला होता. परवाना रद्द करण्याच्या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी होईल. त्यानंतर वैध कारण आढळून आल्यास संबंधितांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे.
वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी कस्पटे कुटुंंबीयांकडून प्रयत्न सुरू होते. त्या वेळी वैष्णवीचे बाळ चव्हाणकडे होते. बाळाला आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीय चव्हाण याच्या घरी गेले होते. मात्र, त्याने त्यांच्याशी वाद घातला. त्याच्याकडील पिस्तूल दाखविले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात पोलिसांनी चव्हाण याच्या घराची, कार्यालयाची झडती घेतली. तेथून लॅपटॉप जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले.
राहायला ग्रामीण भागात; शस्त्र परवाना पुण्याचा
शशांक आणि सुशील हगवणे यांना २०२२ मध्ये शस्त्रपरवाना देण्यात आला. हगवणे मुळशी तालुक्यातील भुकूम गावात राहायला आहेत. या भागाचा समावेश पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत होतो. पण, हगवणे यांना पुणे पोलीस आयुक्तालयातून शस्त्र परवाना देण्यात आला आहे. त्यांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर पडताळणी करून त्यांना परवाना देण्यात आला. यासाठी त्यांनी पुण्यात वास्तव्यास असल्याचा पत्ता दिल्याची शक्यता आहे. दोघांनाही एकाच वर्षी परवाना देण्यात आला.
दोन पिस्तुले, चांदीची भांडी जप्त
वैष्णवी यांना लग्नात चांदीची भांडी देण्यात आली होती. ती पाच ताटे, पाच तांबे जप्त करण्यात आली आहेत. तसेच, हगवणे कुटुंबाकडे असलेली दोन पिस्तुले जप्त केल्याचे बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.