पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन कंपनी सारख्या मोबाईल ॲप्लिकेशन वर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी तरुण आणि तरुणी बुधवारी (ता. २५) बंद पाळणार आहेत. कंपन्यांकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय गिग कामगार मंचाचे केशव क्षीरसागर यांनी सोमवारी दिली.

याबाबत क्षीरसागर म्हणाले की, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कामगारांचा समावेश गिग कामगारांमध्ये होतो. त्यात रिक्षा, कॅबचालक, डिलिव्हरी बॉईजसह इतर अनेक घटकांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून अशा कामगारांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. ग्राहकाने केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता परस्पर त्यांच्यावर कारवाई केली जाते. याबाबत दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा सध्या नाही. या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. 

हेही वाचा >>>पिंपरी: छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी घेणारा व्यायामशाळा प्रशिक्षक अटकेत

राजस्थान सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही गिग कामगार नोंदणी व कल्याणकारी कायदा  लागू करावा. या कंपन्या पिळवणुकीपासून कामगारांना संरक्षण मिळवून द्यावे. महाराष्ट्र सरकारचा कॅब अ‍ॅग्रिगेटर नियम लवकरात लवकर मंजूर करावा, यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

रिक्षा, कॅबचालक निदर्शने करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओला, उबरच्या विरोधात रिक्षा व कॅबचालक प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करणार आहेत. या कंपन्यांकडून चालकांची लूट केली जात आहे. त्यामुळे अ‍ॅग्रिगेटर कायद्याला तातडीने मंजुरी द्यावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही निदर्शने करून निवेदन देणार आहोत, अशी माहिती राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.