पुणे: पूर परिस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि ओढ्यांलगत सीमाभिंती उभारण्यासाठी राज्य शासनाने २०० कोटी रुपयांचा विशेष निधी महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भात शासन निर्णयही राज्य शासनाने जाहीर केला असून निधीच्या उपलब्धतेमुळे रखडलेल्या सीमाभिंतींचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेषत: आंबिल ओढ्या लगतच्या परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे.

पाच वर्षापूर्वी आंबिल ओढ्याला आलेल्या महापूराने शहराच्या दक्षिण भागाची वाताहात केली होती. त्यावेळी पूरामध्ये ओढ्यालगतच्या अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती कोसळल्या होत्या. या सीमाभिंती खासगी जागेत असल्याने त्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास महापालिकेने नकार दिला होता. मात्र तेव्हापासून सीमाभिंतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेने स्वखर्चाने सीमाभिंती बांधाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. सीमाभिंती उभारण्यासाठी राज्य शासनाकडे निधी मागण्याचा प्रस्तावावरही चर्चा झाली होती.

हेही वाचा >>>माजी खासदार नीलेश राणेंचे हॉटेल महापालिकेकडून लाखबंद; ३ कोटी ७७ लाखांचा मिळकतकर थकीत

माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार राज्य शासनाने २०० कोटीं रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून सीमाभिंती उभारण्यास दिला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये महापालिकेला मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण किंवा सीमाभिंती उभारल्या जाणार आहे. सीमाभिंतीमुळे पूर परिस्थितीही पाणी प्रवाही राहण्यास मदत होईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकाल विशेष बाब म्हणून हा निधी मंजूर झाल्याने खासगी जागेतील सीमाभिंतींची कामेही करण्यात येणार आहे. तसेच शासकीय जागांवरील सीमाभिंतीची कामेही करता येणार आहेत. निधी मंजूर झाला असला तरी अद्यापही तो महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. येत्या काही दिवसात निधी उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सीमाभिंतीची कामे केली जातील. आगामी पावसाळ्याच्या तोंडावर प्राधान्यक्रमाने सीमाभिंतीची कामे केली जातील, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.