निसर्गरक्षणासाठी स्वयंशिस्तीची गरज

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमेध वाघमारे निसर्ग मार्गदर्शक म्हणून काम करतात. ‘बर्डमॅन’ अशी ओळख असलेल्या या निसर्गप्रेमीला अनेक पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढता येतात. निसर्ग संवर्धनात कार्यरत असणारे वाघमारे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

कावळ्यांपासून तुमचे अर्थार्जन कसे सुरू झाले?

  • हिंगोली जिल्ह्यातील कलगाव हे माझं गाव. बालपण शेतकरी कुटुंबात गेले असल्यामुळे अवतीभवती कोंबड्या, शेळ्या असे विविध पाळीव प्राणी होते. त्यांच्या सान्निध्यात त्या प्राण्यांचे आवाज काढायला शिकलो. चरायला नेलेल्या शेळ्या-मेंढ्यांना त्यांच्याच आवाजात परत बोलवायचो. शिक्षणासाठी पुण्यात आलो, तेव्हा अर्थार्जनासाठी छोटी-मोठी कामे करायचो. दूध टाकण्यापासून भाजी विकण्यापर्यंत विविध कामे या काळात केली. या भाजीतील टोमॅटो अनेक वेळा खराब व्हायचे, ते बाजूला काढून टाकलेले असायचे. ते खाण्यासाठी कावळे यायचे. त्या वेळी कावळ्यांचा आवाज मी मनापासून ऐकायचो. कावळ्यांचे निरीक्षण करीत असताना त्यांच्या आवाजाचाही अभ्यास करायचो. डबा खाण्यासाठी झाडाखाली बसल्यानंतर अवतीभोवती कावळे यायचे. त्यांना काही खायला द्यायचो. वाटाण्याचे शेत राखायला जायचो तेव्हा कावळ्यांचाच आवाज काढून त्यांना पिटाळून लावायचो. याचा फायदा गावाकडे दशक्रिया विधीच्या वेळी अर्थार्जनासाठी झाला. अनेक राजकीय मंडळी आलेली होती, पण काही केल्या कावळा शिवेना. तेव्हा कोणी तरी मला बोलावले. मी कावळ्यांसारखा आवाज काढल्यानंतर मोठ्या संख्येने कावळे जमा झाले आणि पिंडाला कावळा शिवला. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या छंदामुळे कमाई झाली.

ही वेगळी वाट का चोखाळावीशी वाटली?

  • दहावीनंतर जेव्हा पुण्यात आलो, तेव्हा दिवेगावात राहायचो. भावाला कामात मदत करायचो आणि काॅलेजला जाताना सायकलवर जायचो. वाटेत ओढा लागायचा. ओढ्यातील बदके, म्हशी यांच्या ओरडण्याचे नकळतच निरीक्षण करायचो आणि त्यांचा आवाज काढायचा प्रयत्न करायचो. सरावाने ते उत्तम जमू लागले. या कलेबद्दल इतरांना जेव्हा समजले, तेव्हा शाळा-शाळांमधून निमंत्रण येऊ लागले. मी मुलांना विविध पक्ष्यांचा आवाज काढून दाखवायचो. पहिल्या कार्यक्रमात मुलांकडून जमा झालेली पन्नास रुपयांची चिल्लर मानधन म्हणून मिळाले होते. नंतर अनेक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांनी कलेची कदर करत बक्षिसी द्यायला सुरुवात केली. मला या सगळ्या कार्यक्रमात केवळ मुलांना आनंद देण्याची इच्छा होती. सहावीत असताना विविध वाद्यांच्या आवाजाचीही नक्कल करायला शिकलो. या कलेची दखल शाळांच्या बरोबरीने सर्वांत आधी आकाशवाणी सांगली केंद्राने घेतली होती.

पक्ष्यांच्या ओरडण्याबद्दल काही अंधश्रद्धा असतात, त्याबद्दल काय सांगाल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • घुबड, टिटवी यांच्या ओरडण्यातून काही गैरसमज करून घेतले जातात. खरे तर सगळेच पक्षी त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीनुसार ओरडत असतात. टिटवीच्या घरट्यावर हल्ला करायला कोणी पक्षी, प्राणी आला, तर घरटे वाचवण्यासाठी टिटवी माणसांची मदत मागत त्यांच्या घरावरून ओरडत जाते. पण, त्यातही माणसांना कारण नसताना उगाचच अशुभाचे संकेत असल्यासारखे वाटते. पक्षी शेताचा नाश करतात, असे अनेकदा शेतकऱ्यांना वाटते. पण, काही पक्षी हे त्या कणसावरची कीड खाण्यासाठी आलेले असतात आणि त्यामुळे खरे तर शेतकऱ्याचा फायदाच होतो; पण हे लक्षात घेतले जात नाही.

कार्यक्रमांमधून तुम्ही कोणता संदेश देता?

  • जंगलांमुळे, अर्थातच वृक्षांमुळे सगळी जीवसृष्टी तरते. वृक्षांशिवाय ऑक्सिजन कोणीच देऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला आणि कुटुंबीयांना जगवायचे असेल, तर ऑक्सिजन आवश्यक आहे. आणि तो केवळ वृक्षांद्वारेच मिळतो. त्यामुळे वृक्षसंवर्धन ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. निसर्गाची जपणूक आणि निसर्गाचा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा, त्यातून जीवनाचा खरा अर्थ आपल्याला उमगू शकतो. पर्यावरणासाठी भक्षक ठरलेल्या प्लास्टिकच्या वापरावर स्वयंशिस्तीने निर्बंध आणण्याची गरज आहे. आम्ही गायीसारख्या प्राण्याच्या पोटातून कित्येक किलो प्लास्टिक काढून त्यांना जीवदान दिले आहे. म्हणून इतक्या हक्काने हे सांगू शकतो आहे.
    shriram.oak@expressindia.com