संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने जगभरात २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्षे म्हणून साजरे केले जाणार आहे. राज्य सरकारनेही या बाबत सप्तसूत्री जाहीर केली असून, पुढील वर्षभर नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात येणार आहे.कृषी विभागाच्या वतीने तृणधान्यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ करणे. पोषणमूल्य व आरोग्यविषयक फायदे लोकांना समजावून सांगणे, तृणधान्यांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योगाला चालना आणि तृणधान्यांविषयक पाककलेची प्रसिद्धी करणे, प्रक्रियेतून व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लावणे, निर्यातवृद्धी करणे आणि सरकारी धोरणात्मक निर्णयाद्वारे तृणधान्य चळवळीला बळकटी देणे या सप्तसूत्रीद्वारे राज्यात तृणधान्य वर्ष साजरे केले जाणार आहे.

संस्कृती, परंपरांचा घातला मेळ
जानेवारी महिन्यात मकर संक्रातीनिमित्त बाजरीच्या भाकरीसह अन्य पदार्थांचा आहारात वापर वाढविणे. फेब्रुवारी महिन्यात राज्यभरात हुरडा पार्ट्यांचे आयोजन करून ज्वारीविषयक जागृती करणे. ऑगस्ट महिन्यात श्रावणातील विविध उपवासासाठी राजगिऱ्याचा वापर वाढविणे. सप्टेंबर महिन्यातील पितृपक्षात राळ्याचा पदार्थांविषयी माहिती देणे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रनिमित्त उपवासात वरईचा वापर वाढविणे आणि डिसेंबर महिन्यात नाचणी आणि रागीचा आहारातील समावेशाबाबत जागृती करणे, असा कार्यक्रमही सप्तसूत्रीत समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृणधान्य वर्ष साजरे करीत असताना केवळ दिखाऊपणा न करता. तृणधान्यांच्या लागवड क्षेत्रात वाढ करणे, उत्पादन आणि उत्पादकतेत वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. तृणधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि निर्यात वृद्धीसह निर्यातीत सातत्य राहील, यासाठी ठोस धोरणात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.- विकास पाटील, संचालक (विकास आणि विस्तार)