पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम प्रकल्पात २० पेक्षा अधिक सदनिका किंवा दुकाने असतील, तर त्या प्रकल्पांमध्ये दस्त नोंदणीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेंतर्गत नागरिकांना दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नसून बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातच दस्त नोंदणी केली जाते. त्यानुसार पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांतील सुमारे ११० प्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांना विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून नोंदणी विभागाने संगणक प्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला आहे. २० पेक्षा अधिक सदनिका किंवा दुकाने असतील, तर अशा गृहप्रकल्पांमध्ये आता ई-रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त नवीन सदनिकांच्या (फर्स्ट सेल) दस्त नोंदणीसाठी आहे. यामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत नाही.

हेही वाचा – मुंबई-पुण्याची घरांच्या विक्रीत देशभरात आघाडी

म्हाडा, पीएमआरडीए यांच्याकडून सोडतीद्वारे वाटप केलेल्या सदनिकांच्या दस्त नोंदणीसाठीसुद्धा ई-रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फायदा होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून ई-रजिस्ट्रेशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही शहरात मिळून सुमारे ११० प्रकल्पांमध्ये ही सुविधा सुरू आहे. ई-रजिस्ट्रेशन सुविधेची माहिती जास्तीत जास्त विकासकांपर्यंत पोहोचवावी. जास्तीत जास्त विकासकांना या प्रणालीमध्ये सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे.

हेही वाचा – मेट्रोचे गौडबंगाल : पुणे मेट्रो सेवा सुरू करण्यास दिलेल्या मंजुरीची माहितीच नाकारली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदनिकांची दस्त नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत २७ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. गेल्या काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवीन बांधकाम प्रकल्पांना ई-रजिस्ट्रेशन या सुविधेचा फायदा होत आहे. मुख्यत्वे दस्त नोंदणी कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली आहे. नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदविता येत आहेत. – संतोष हिंगाणे, मुद्रांक जिल्हाधिकारी