पुणे : जून-जुलै महिन्यांत किरकोळ बाजारात २५० रुपये किलोंवर गेलेले टोमॅटोचे दर दहा-पंधरा रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांना जेमतेम दोन ते पाच रुपये दर मिळत असल्याने काढणी आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतशिवारांत टोमॅटोचा लाल चिखल झाला असून शेतकरी चक्क उभ्या पिकांत जनावरे सोडत आहेत.

मे, जून, जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरावडय़ापर्यंत देशभरात टोमॅटोचे दर चढे होते. दिल्लीसह उत्तर भारतात टोमॅटोचे २५० ते ३०० रुपये किलोवर गेले होते. केंद्र सरकारने नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करून सवलतीच्या दरात विक्री सुरू केली होती. ऑगस्टअखेरपासून टोमॅटोच्या दरात पडझड सुरू झाली. आता किरकोळ बाजारात दर्जेदार टोमॅटोला केवळ दहा ते पंधरा रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांना जेमतेम दोन ते पाच रुपये दर मिळतो आहे. कमी दर्जाच्या टोमॅटोला मागणी आणि दरही नसल्यामुळे टोमॅटोचा शेतीच्या बांधांवर खच पडला आहे.

हेही वाचा >>>विश्वचषक सामन्यावर ऑनलाईन बेटिंग, ४० लाखांची रोकड जप्त; पिंपरी चिंचवड पोलिसांचा गुंड बुकीवर छापा

उत्पन्न खर्च निघून शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्यासाठी टोमॅटोला प्रति किलो पंधरा ते वीस रुपये दर मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील फलटणचे टोमॅटो उत्पादक शेतकरी अजित कोरडे यांनी व्यक्त केली.

दिवाळीनंतर दरात सुधारणा ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज दहा ते बारा हजार कॅरेट टोमॅटो आवक होते. पुण्यातून परराज्यात टोमॅटो जाणे बंद झाले आहे. देशभरात त्या-त्या भागात स्थानिक पातळीवर पुरेसे टोमॅटो उत्पादन होत आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त, अशी अवस्था आहे. दिवाळीनंतर हळूहळू दरात सुधारणा होईल, अशी माहिती अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.