पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विश्रांतवाडी, वारजे माळवाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविला, तसेच कात्रज भागातील एका टायर विक्री दुकानातून चोरट्यांनी ५८ हजार रुपयाचे टायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

वारजे माळवाडीतील पृथक काॅर्नर सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे २७ जुलै रोजी सदनिका बंद करून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, लॅपटाॅप, मोबाइल संच असा सात लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.

विश्रांतवाडीतील जयवंत सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ११ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे आळंदी रस्त्यावरील कळस चौकातील जयवंत साेसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

टायर विक्री दुकानात चोरी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात असलेल्या एका टायर विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५८ टायर लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादाराचे गोकुळनगर परिसरात जय शंकर टायर हे दुकान आहे. चाेरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून ५९ हजारांचे टायर लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्य विक्री दुकानातून रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविल्या

शहरातील मद्य विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड, तसेच मद्याच्या बाटल्या लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड आणि मद्याच्या बाटल्या असा सात लाख नऊ हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे बिबवेवाडीतील कोठारी ब्लाॅक परिसरात मद्य विक्री दुकान आहे. चोरट्यांनी मद्य विक्रीचे दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविल्या. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत. यापूर्वी वारजे, कल्याणीनगर, येरवडा भागातील मद्य विक्रीच्या दुकानातून रोकड आणि मद्याच्या बाटल्या लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत.