पुणे : चोरी करण्यासाठीा चोरटे नवनवीन शक्कल वापरतात. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, तसेच कोणतेही धागेदोरे मागे राहू नयेत, याची पुरेपर काळजी चोरटे घेतात. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेपासून चोरटे वाचू शकत नाहीत. रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचे बंडल चाेरून नेल्याची घटना नुकतीच घडली. सराईत चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून महिलांसारखा वेश परिधान केला होता. पण, सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास करुन दोन सराईत चोरट्यांना अटक केली आणि अखेरीस गुन्हा उघडकीस आणलाच. त्यांच्याकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आल्या.
अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हारको ट्रान्सफाॅर्मर कंपनीत २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी ओळख लपविण्यासाठी महिलांसारखा वेश परिधान केला होता. कंपनीच्या खिडकीचा गज तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. एका चोरट्याने पिवळा गाउन, तर दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार-कमीज असा वेश परिधान केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. चोरट्यांनी तोंडाला ओढणी आणि स्कार्फ बांधून कंपनीतील खोलीतून तांब्याच्या तारांचे बंडल आणि पट्ट्या चोरून नेल्या हाेत्या.
२७ ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत कंपनीतील व्यवस्थापकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात महिलांसारखा वेश परिधान करून कंपनीत चोरी करणारे चोरटे सराईत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गोपाळ मदने, अमोल गायकवाड आणि अर्शद सय्यद यांना मिळाली. पोलिसांनी चोरटे अमन शेख आणि मुसा शेख यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा, पट्ट्या, हार्ड डिस्क असा दोन लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, अभि चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी ही कामगिरी केली.