पुणे : दुचाकीस्वार तरुणाकडील साडेचार लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मुंढवा भागात राहायला आहे. २६ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण मुंढव्यातील केशवनगर-मांजरी रस्त्याने निघाला होता. त्या वेळी अन्य दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तरुणाच्या गळ्यातील साडेचार लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावली. तरुणाने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे भरधाव वेगात अंधारात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पोमण तपास करत आहेत.

तरुणाकडील मोबाइल हिसकावला

नारायण पेठेत पादचारी तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण नारायण पेठेत राहायला आहे. हा तरुण सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री सव्वानऊच्या सुमारास नारायण पेठेतील क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळ परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील ४० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी नारायण पेठ परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.

रेल्वे स्थानकाच्या आवारातून बुलेट चोरी

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील वाहनतळावर लावलेली बुलेट चोरट्यांनी चाेरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण हडपसरमधील फुरसुंगी भागात राहायला आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील वाहनतळावर त्याने बुलेट लावली होती. चोरट्यांनी बुलेटच्या हँडलचे लाॅक तोडून बुलेट चोरून नेल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली. चोरीला गेलेल्या बुलेटची किंमत दोन लाख ३० हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

लोणी काळभोरमध्ये घरफोडी

लोणी काळभोर भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोणी काळभोरमधील बाजारमळा परिसरात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.