पिंपरी : दुचाकीवरील दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावल्यानंतर पोलीस दिसताच गडबडीत पळताना सोनसाखळी काही अंतरावर पडली. पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता सोनसाखळी सापडली. अवघ्या पाच मिनिटात हिसकावलेली सोनसाखळी महिलेला परत मिळाली. ही घटना चिखलीतील शिवाजी पार्क येथे घडली.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील शिवाजी पार्क येथे एक महिला रस्त्याने चालली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. मात्र, त्याचवेळी गस्तीवरील पोलीस चोरट्यांना दिसले. घाईगडबडीत ते चोरटे पोलिसांना पाहताच पळून गेले. पोलिसांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यामध्ये चोरट्यांच्या हातातून काहीतरी पडल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी परिसर पिंजून काढला. अवघ्या पाच मिनिटात हिसकावलेली सोनसाखळी मिळून आली. पोलिसांनी सोनसाखळी संबंधित महिलेच्या स्वाधीन केली.
आता तक्रार नको
पोलिसांनी त्वरीत सोनसाखळी शोधून काढली. अन् महिलेच्या स्वाधीन केली. पोलिसांनी महिलेला तक्रार देण्याची विनंती केली. मात्र, महिलेने माझी चैन मिळाली, मला तक्रार करायची नाही असे उत्तर दिले. पोलिसांनी महिलेच्या पतीलाही विनवणी केली. मात्र, त्यानेही आम्हाला कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले.