पुणे : पीएमपी प्रवासी ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पद्मावती परिसरात राहायला आहेत. ते रविवारी (१५ जून) सिंहगड रस्ता ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होते. बसमध्ये गर्दी होती.
चोरट्याने ज्येष्ठाच्या गळ्यातील २० हजारांची सोनसाखळी चोरून नेली. स्वारगेट स्थानकात ते बसमधून उतरले, तेव्हा गळ्यातून सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश आलाटे तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.