पुणे : गणेश विसर्जन सोहळ्यात चोरट्यांनी नागरिकांकडील मोबाइल संच, दागिने लांबविल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहर, तसेच परगावातून नागरिकांची गर्दी झाली होती. विसर्जन सोहळ्यातील गर्दीत चोरट्यांनी नागरिकांकडील मोबाइल संच, सोनसाखळ्या, मंगळसूत्र लांबविल्याच्या घटना घडल्या. बेलबाग चौकात रविवारी (७ सप्टेंबर) मध्यरात्री एका तरुणाकडील ६५ हजार रुपयांचा मोबाइल संच चोरट्यांनी लांबविला. याबाबत एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण पर्वती परिसरात राहायला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार मोकाशी तपास करत आहेत.
विसर्जन सोहळ्यात शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास एका ज्येष्ठ नागरिकाकडील १२ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार कवठे तपास करत आहेत. कात्रज भागातून विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ८९ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास लांबविल्याची घटना टिळक चौकात घडली. याबाबत महिलेने विश्रामबाग पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.
शनिवार वाडा परिसरात एका तरुणाच्या गळ्यातील ४६ हजार रुपयांची सोनसाखळी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. तक्रारदार तरुण पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात राहायला आहेत. तो विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मध्य भागात आला होता. तरुणाने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार सचिन अहिवळे तपास करत आहेत.पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख भागात राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना बेलबाग चौकात घडली. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार कदम तपास करत आहेत.
लश्र्मी रस्त्यावरील श्री गुरुजी तालीम मंडळ परिसरात चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील १५ हजार रुपयांची सोनसाखळी लांबविली. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात एका तरुणाच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौकात एका तरुणाच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या तरुणाकडील एक लाख २५ हजार रुपयांचे दोन महागडे मोबाइल संच चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलीस हवालदार नितीन तेलंगे तपास करत आहेत.