Swargate Pune / पुणे : स्वारगेट परिसरात प्रवासी महिलांकडील दोन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पीएमपीएमएल प्रवासी महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना स्वारगेट स्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महर्षीनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट पीएमपीएमएल स्थानक परिसरात थांबल्या होत्या. धायरीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. बसमध्ये त्या प्रवेश करत होत्या. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक केतकार तपास करत आहेत.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला चिंचवडच्या आहेत. त्या स्वारगेट ते पंढरपूर या मार्गावरील बसमध्ये सोमवारी सकाळी प्रवेश करत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती.

चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. प्रवासात दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिला हडपसर भागात बसमधून उतरल्या. त्यांनी हडपसरमधील फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस कर्मचारी प्रवीण पाेटे तपास करत आहेत.