आजच्या तरुणांची विचारांची उंची व दूरदृष्टी मोठी आहे. आम्हाला प्रचार व प्रसारातून जे महिनोंमहिने जमत नाही ते अवघ्या दोन- तीन मिनिटांच्या लघुपटाच्या माध्यमातून या तरुणाईने दाखविले आहे, असे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड यांनी काढले.
पायल तिवारी फाऊंडेशन न एनएसयूआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, आमदार दीप्ती चवधरी, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता मनोज तिवारी, तारक मेहता फेम शैलेश लोढा, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, राज्य एनएसयूआयचे सरचिटणीस अमिर शेख, फाऊंडेशेनच्या अध्यक्षा संगीता तिवारी आदी त्या वेळी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाल्या, महोत्सवातील महिलांबाबतचे लघुपट फाऊंडेशनने एकत्रित करावेत. येत्या आठ मार्चला त्याचे प्रदर्शन मुख्यमंत्र्यांसमोर करून या तरुणाईला पुढे आणण्याचे काम केले जाईल.
तेंडुलकर म्हणाले, समाजात चांगली माणसे निर्माण करण्याचे सामथ्र्य कलाकारांमध्ये आहे. ज्या चांगल्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो, त्याप्रमाणे आपण सातत्याने वागलो पाहिजे.
अॅक्शन फिल्म, अॅनिमेशन आणि मोबाईल फिल्म या तीन विभागात घेण्यात आलेल्या लघुपट महोत्सवात राज्यातील १४० चित्रपट आले होते. अॅक्शन विभागात ‘डोंगरापल्याड’ या लघुपटास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. याच चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय वारे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. अॅनिमेशन गटात गिफ्ट द मिसप्लेज या लघुपटास पारितोषिक देण्यात आले. मोबाईल गटामध्ये सेव द गर्ल चाईल्ड या लघुपटाची निवड करण्यात आली.