पुणे : शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्याच्या दृष्टीने तिसऱ्या टप्प्यात सातारा रस्त्यावरील नवले पूल ते सारोळे आणि हिंजवडी ते माण येथे कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईच्या पहिल्या दोन टप्प्यांसह आत्तापर्यंत महामार्गालतची एकूण सव्वाचार हजार अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेगही वाढला आहे.

‘पीएमआरडीए’ने तीस दिवसांत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे तसेच अन्य काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर याअंतर्गत संयुक्त कारवाई हाती घेण्यात आली आहे. या कारवाईचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यातील कारवाई सुरू आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत एकूण सव्वाचार हजार अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. पीएमआरडीएसह पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आण‍ि पुणे ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि एसएसईबी विभागांमार्फत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.

कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात पुणे सातारा रस्त्यावरील नवले पूल ते सारोळे, हडपसर (शेवाळेवाडी ) ते दिवे घाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर ते माण या रस्त्यांसह महामार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. गेल्या दहा दिवसात या परिसरातील ७५० हून अधिक अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. यामध्ये महामार्गासह राज्यमार्ग रस्त्यालगत असणारी दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी आणि अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहेत. दरम्यान, अनेक स्थानिक जागामालकांनीही स्वत:हून अतिक्रमणे काढून टाकली असल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्वीच्या पुणे नगर रस्त्यावरील शिक्रापूर ते शिरूर तसेच बावधन बुद्रुक ते एनडीए रस्ता येथील बकाजी कॉर्नर ते स्मशान भूमी या ठिकाणी संयुक्त कारवाई शुक्रवारपासून (२८ मार्च) करण्यात येणार आहे.

संबंध‍ित रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमआरडीचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, वाहतुक विभागाचे उप आयुक्त बापू बांगर, कार्यकारी अभियंता शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.