स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीला येत्या २१ तारखेला आपण ताठ मानेने सामोरे जाणार आहोत. संघटनेने दिलेल्या २६ प्रश्नांबाबत आपण सध्या विचार करत आहोत. अशा समित्या किती आल्या आणि जातील, असे राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत पुण्यात म्हणाले. भाजपच्या कार्यक्रमानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमातून मला ऊर्जा मिळाली आहे, सांगत याद्वारे त्यांनी चौकशी समितीला इशाराच दिला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घडवले असून मी सरकारमध्ये संघटनेचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. तसेच प्रत्येकाला लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याप्रमाणे मी मंत्रीमंडळात आपली भूमिका मांडत आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान खासदार राजू शेट्टी यांना मध्यप्रदेश येथे अटक करण्यात आली. यावर बोलताना ते पुढे म्हणाले, त्यांच्या अटकेबाबत आपल्याकडे अद्याप काही माहिती नसून त्यांना अटक झाली असेल तर तेथील सरकारने परिस्थिती पाहून निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सदाभाऊ खोत हे पुण्यात आयोजित समितीच्या बैठकीला वैयक्तिक कारणासत्व उपस्थित राहू शकले नव्हते असा खुलासा त्यांनी नुकताच समितीसमोर केला होता. त्यामुळे समितीने आता २१ जुलै ही अंतिम तारीख दिली आहे. सदाभाऊ खोत यांच्या पावित्र्यामुळे समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.