लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक लवकर सादर होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये अंदाजपत्रक सादर होण्याच्या शक्यतेने विविध विभागांकडूनही तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय अडचण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे महसुली, भांडवली उत्पन्न आणि खर्चाचा आराखडा (प्रारूप अंदाजपत्रक) प्रशासनाकडून केले जाते. जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्त प्रारूप अंदाजपत्रक स्थायी समितीला जानेवारी महिन्यात सादर करतात. त्यानंतर स्थायी समितीकडून त्यामध्ये काही सुधारणा करून ते मुख्य सभेला सादर केले जाते. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर एप्रिल महिन्यापासून अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होते.
आणखी वाचा-आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री; दलालांविरुद्ध गुन्हा दाखल
महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेचा कारभार आयुक्त विक्रम कुमार प्रशासक म्हणून चालवित आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती आणि मुख्य सभा होत आहेत. लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. ही निवडणूक वेळेवर होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक आचारसंहितेत अडकण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची प्रशासकीय अडचण टाळण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच २०२४-२५ या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.
आणखी वाचा-एटीएसची मोठी कारवाई : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक
महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला. गणेशोत्सव संपल्यानंतर यासंदर्भात महापालिकेत बैठक होणार आहे. अंदाजपत्रक डिसेंबर महिन्यात सादर होण्याच्या शक्यतेने महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांकडून तयारी सुरू झाली आहे. नवे प्रकल्प, योजना तसेच जुन्या प्रकल्पांच्या कामाची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली असून चालू आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाची तसेच अपेक्षित खर्चाची माहिती तयार करण्याची सूचना खातेप्रमुखांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. सहा महिन्यांच्या उत्पन्न आणि खर्चाचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.