महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांचे संमतिपत्र घेऊन जागेवरच मोबदल्याचा धनादेश देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मावळ आणि मुळशी तालुक्यातील २६ गावांमध्ये पुढील आठवड्यापासून हे शिबीर सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ आणि मुळशी या दोन तालुक्यांतील २६ गावांत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याचे मुल्यांकन करताना जागा मालकांना विश्वासात घेऊन आणि त्यांची संमती घेऊन निश्चित करण्यात आले आहे. मुल्यांकन निश्चित करताना ज्या मोकळ्या जमिनी आहेत, त्यांचे आणि ज्या जमिनींवर झाडे, घरे आदी असे मुल्यांकन करून भूसंपादनाचा मोबदला निश्चित केला आहे. त्यास जागा मालकांनी संमती दिली आहे. त्यामुळे संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात दोन गावांत तीन दिवस शिबीर घेतले जाणार आहे. या शिबिरात जागा मालकांचे संमतिपत्र घेऊन त्यांना जागेवर मोबदल्याचे धनादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : ‘कुमार कोश’चे दोन खंड सहा महिन्यांत वाचकांच्या हाती

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएसआरडीसीने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, आकस्मिक प्रसंगी अर्ध्या तासात उपचार

प्रकल्पाचा आढावा

  • प्रकल्पासाठी २२ हजार कोटी अपेक्षित खर्च.
  • बीओटी तत्त्वावर राबविल्यास अपेक्षित प्रकल्पाची किंमत २६ हजार ८१८.८४ कोटी.
  • एकूण भूसंपादनाचा खर्च सुमारे ११ हजार कोटी.
  • रस्ता बांधणीसाठी अंदाजे खर्च सात हजार कोटी.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who voluntarily give land for ring road in pune will get compensation checks on the spot pune print news psg 17 ssb
First published on: 21-01-2023 at 11:24 IST