पिंपरी: सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी औंध जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय अधिकारी, शल्य चिकित्सक आणि सहाय्यक अधीक्षक अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून पकडण्यात आले आहे.
औंध जिल्हा रूग्णालयातील प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी (वय-५२), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव बापूराव कनकवळे (वय – ५०) आणि सहाय्यक अधीक्षक संजय सीताराम कडाळे (वय ४५) यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिकापूर येथील सोनोग्राफी सेंटर चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
या विभागाचे पोलीस उपअधीक्षक (प्रशासन) श्रीहरी पाटील यांनी याबाबतची पत्रकारांना माहिती दिली. तक्रारदाराच्या सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करायचे होते. त्यासाठी ४० हजार रूपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराला हे पैसे द्यायचे नव्हते म्हणून त्याने तक्रार दिली. त्यानुसार, रूग्णालयात सापळा रचण्यात आला. ४० पैकी १२ हजार रूपयांची लाच घेताना आरोपींना पकडण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.