खंडाळा घाटात सहा वाहने एकमेकांवर आदळली

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी खंडाळा घाटात घडली. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

अपघातात टेम्पोचालक अक्रम तसेच मोटारचालक इर्शाद सिद्दीकी (वय ३१, रा. वांद्रे, मुंबई), रौनक मोरदानी (वय २७, रा. खार, मुंबई) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या टेम्पोचालकाचे पूर्णनाव आणि पत्ता समजला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. खंडाळा घाटातून सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आदळला. त्यावेळी कोंबड्यांची वाहतूक करणारा एक टेम्पो मोटारीवर आदळला. मोटारीतील इर्शाद सिद्दीकी, रौनक मोरदानी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा घाटातील महामार्ग पोलीस, खोपोली वाहतूक पोलीस, आयआरबी, डेल्टा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा तसेच ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला ’ या संस्थेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

मोटार, टेम्पोत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.  खंडाळा घाटातील उतारावर अनेक वाहनचालक इंधन वाचविण्यासाठी वाहने बंद (न्यूट्रल) करून पुढे नेतात. त्यामुळे तीव्र उतारावर वाहनांचा ब्रेक लागत नाही तसेच स्टेअरिंगवरचे नियंत्रण सुटते. त्यामुळे अपघात घडतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.