करोनामुळे नुकसान झालेल्या उद्योगांना तथा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आगामी तीन महिने मिळकतकर माफ करण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला आहे. त्यानुसार, पिंपरी पालिकेच्या हद्दीतील सुमारे ६० हजार मिळकतींना ही करमाफी मिळू शकणार आहे.

शहरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसलेला आहे. या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. अशा परिस्थितीत, त्यांना दिलासा देण्यासाठी सर्व लघुउद्योग आणि बिगरनिवासी व्यावसायिक मिळकतींना तीन महिन्यांचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी बैठकीत घेतला. या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे पक्षनेते नामदेव ढाके यांनी  सांगितले.

शहरात परप्रांतातून आलेले नागरिक मोठय़ा संख्येने राहतात. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी महापालिकेकडून मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी महापौर निधीतून रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चिंचवडचे आनंदनगर, पिंपरीतील भाटनगरसारख्या  झोपडपट्टी भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. तेथे धारावीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.