पिंपरी : उद्वाहकामधून (लिफ्ट) जात असताना अचानक उद्वाहक बंद पडल्याने तिघेजण अडकले. ही घटना सोमवारी रावेत येथील म्हस्के वस्तीमधील श्रीहरी गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर तिघांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
तेजस्विनी देवरे (वय २८), कुशल देवरे (वय ६), समृद्ध घाडगे (वय २३) अशी उद्वाहकामधून सुखरूप बाहेर काढलेल्यांची नावे आहेत. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के वस्ती येथे श्रीहरी गृहनिर्माण सोसायटी ही पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या उद्वाहकामधून हे तिघेजण येत असताना पहिल्या मजल्यावर उद्वाहक अचानक बंद पडले.
सोसायटीतील रहिवाशांना हा प्रकार समजल्यानंतर उद्वाहकामध्ये अडकलेल्या तिघांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. याबाबत महापालिका अग्निशामक दलालाही कळविण्यात आले. मात्र, दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सोसायटीतील उद्वाहकचालकाने तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, पाच दिवसांपूर्वीच चऱ्होलीतील चोविसावाडी येथे रामस्मृती हाउसिंग सोसायटीत उद्वाहकामध्ये अडकून ११ वर्षीय अमेय फडतरे या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रावेत येथील सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.