पुणे : जुगार खेळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. पोलीस हवालदार रमेश शामराव ढमढेरे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. मुंढवा भागात जुगार खेळल्याप्रकरणी पोलिसांनी २०१६ मध्ये कारवाई केली होती. जुगार खेळताना चौघांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

या गुन्ह्यात न्यायालयाने चौघांना प्रत्येकी २०० रुपये दंडाची शिक्षा करुन त्यांची मुक्तता केली होती. त्यानंतर पोलीस हवालदार ढमढेरे याने चौघांना जुगाराच्या गुन्ह्यामध्ये मदत केल्याने एक हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून लाच घेताना ढमढेरे याला पकडले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांनी विशेष न्यायालयात ढमढेरे याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ढमढेरे याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालायने आदेशात म्हटले आहे. न्यायालयीन कामकाजात पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि हवालदार संतोष डोके यांनी सहाय केले.

साताऱ्यात पोलीस उपनिरीक्षकाला दोन वर्ष सक्तमजुरी

तक्रार अर्ज प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर याला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सातारा येथील विशेष न्यायालयाने याबाबतचे आदेश दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी सातारा येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील एम. व्ही. कुलकर्णी यांनी बाजू मांडली. पोलीस निरीक्षक सचिन राऊत आणि सहायक पोलीस फौजदार राजेश विरकर यांनी सहाय केले. शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने लाच मागितल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधाक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.