लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेल्या केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांवर भरतीचा मुहूर्त लागला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे २ हजार ३८४ रिक्त पदांची भरती केली जाणार असून, त्यासाठीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीमार्फत जूनच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवणे आणि शिक्षणाचा दर्जा उचावण्यासाठी ४ हजार ८६० केंद्र प्रमुखांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी आदी कारणांनी बहुसंख्य पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असल्याने अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीने आणि ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे २ हजार ३८४ पदांसाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा होणार आहे. परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती कालावधी याबाबतची माहिती अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्ध केली.

आणखी वाचा-ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पुणेकरांची भरारी! २० लाख पुणेकरांनी केला ‘एवढ्या’ कोटींचा भरणा

विभागीय भरतीअंतर्गत राज्यात सर्वाधिक १५३ पदे पुणे जिल्ह्यात, तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्यात ३० जागांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनाच ही परीक्षा देता येणार आहे. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे, तर किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

जिल्हानिहाय पदे

पुणे- १५३, अहमदनगर- १२३, सोलापूर- ९९, कोल्हापूर-८५, सांगली – ६७, सातारा- १११, रत्नागिरी- १२५, सिंधुदुर्ग- ६१, नाशिक- १२२, नंदूरबार- ३३, धुळे-४०, जळगाव-८०, अमरावती – ६९, बुलढाणा- ६५, अकोला ४२, वाशिम – ३५, यवतमाळ- ९०, नागपूर-६८, वर्धा ४३, भंडारा – ३०, गोंदिया- ४२, राज्यातील गडचिरोली ५०, चंद्रपूर- ६६, औरंगाबाद-६४, हिंगोली-३४, परभणी ४३, जालना-५३, बीड- ७८, लातूर – ५०, उस्मानाबाद- ४०, नांदेड- ८७, ठाणे- ४७, रायगड- ११४, पालघर- ७५.

परीक्षेचे स्वरुप

-मराठी आणि इंग्रजी माध्यमातून परीक्षा

-परीक्षेसाठी २०० प्रश्नांची, २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका

-परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

-प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-पहिली प्रश्नपत्रिका बुद्धीमत्ता व अभियोग्यता घटकांवर, तर दुसरी प्रश्नपत्रिका शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम आदींवर आधारित