एके काळी प्रतिष्ठा आणि गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात (टिमवि) फक्त प्रशासकीयच नाही, तर शैक्षणिक मुद्दय़ांवरही मनमानी कारभार आहे. टिळक कुटुंबीयांच्या आप्तेष्टांना पदे आणि पदव्यांची खिरापत नियम डावलून सर्रास वाटली जात आहे. आपल्या विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम चालवण्यासाठी स्वायत्त मंडळांची मान्यता घेऊन आता त्या अभ्यासक्रमांना इतर विद्यापीठांची संलग्नता मिळावी म्हणून अर्ज करण्यात आले आहेत. विद्यापीठातील नियमबाह्य़ नियुक्तयांबाबत माजी कुलगुरू डॉ. हिरा आद्यंताया यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
एखाद्या विद्यापीठात शैक्षणिकदृष्टय़ा सर्वात महत्त्वाचे पद असते, ते विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांचे. अभ्यासक्रमाची आखणी, नवे उपक्रम अशा सगळ्याच मुद्दय़ांवर अधिष्ठात्यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, विद्यापीठाच्या काही विभागांचे अधिष्ठाता पद हे शैक्षणिक क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही देण्यात आले आहे. ज्या विद्याशाखेत शिक्षण झाले आहे, त्या विद्याशाखेचे अधिष्ठातापद न देता भलत्याच विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून नियुक्तया करण्यात आल्या आहेत. दूरशिक्षण विद्याशाखा, आरोग्यविज्ञान शाखा यांच्या अधिष्ठातापदी शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाची नवी ओळख ही आप्तेष्टांना पीएच.डी करण्याचे हक्काचे ठिकाण अशी होऊ पाहात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांना केराची टोपली दाखवून पात्रतेचे निकष पूर्ण झालेले नसतानाही पीएच.डीला अनेक मान्यवरांना प्रवेश दिला गेला. पीएच.डी पूर्ण करून पदवी मिळवण्याच्या प्रक्रियेतही नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.एका नातेवाइकाचे पीएच.डीचे प्रमाणपत्र तर एका रात्रीत तयार झाले होते. पीएच.डीसाठी नोंदणी झाल्यानंतर त्याने तीन वेळा पीएच.डीचा विषय बदलला होता. २०१३ साली १० जानेवारीला त्याची तोंडी परीक्षा झाली, ११ जानेवारीला त्याला पीएच.डी देण्यातही आली आणि १२ जानेवारीला पदवीप्रदान समारंभासाठी त्याचे पीएच.डीचे चक्क प्रमाणपत्रही तयार होते.
विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमांबाबतही नियम धाब्यावर बसवण्यात येत आहेत. ज्या अभ्यासक्रमांना टिमविशी संलग्न अभ्यासक्रम म्हणून स्वायत्त संस्थांची मान्यता घेण्यात आली आहे, त्या अभ्यासक्रमांना इतर विद्यापीठांची मान्यता मिळावी म्हणून विद्यापीठाकडून अर्ज करण्यात आले आहेत. पुणे, सोलापूर, मुंबई आणि नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी काही अभ्यासक्रम जोडले जावेत यासाठी सध्या विद्यापीठाकडून प्रक्रिया सुरू आहे. संलग्नीकरणाचे हे खास काम करण्यासाठी विशेष पदाचीही निर्मिती करण्यात आली आहे.
‘प्रत्येक विद्याशाखेतील सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ प्राध्यापकांची नियुक्ती अधिष्ठातापदी करण्यात यावी असा नियम आहे. मात्र, विद्यापीठात नियमबाह्य़ नियुक्तया होत असतील तर ते चुकीचे आहे. पीएच.डी देतानाही निकष पाळणे गरजेचे आहे.’
– डॉ. हिरा आद्यंताया, माजी कुलगुरू, टिमवि
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2014 रोजी प्रकाशित
सुराज्य ते कुराज्य (भाग २) : आप्तांना पदव्या आणि पदांची खिरापत
शैक्षणिक मुद्दय़ांवरही मनमानी कारभार आहे. टिळक कुटुंबीयांच्या आप्तेष्टांना पदे आणि पदव्यांची खिरापत नियम डावलून सर्रास वाटली जात आहे.

First published on: 24-12-2014 at 03:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmv tilak family syllabus