लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महिनाभरापासून तेजीत असलेल्या टोमॅटोची आवक वाढल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर आता कमी झाले आहेत. नवीन लागवड केलेल्या टोमॅटोची आवक बाजारात सुरू झाली असून, रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ११ हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक झाली. टोमॅटोसह कांदा, काकडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, कारले या फळभाज्यांच्या दरात घट झाली. तसेच निर्यातशुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरातही घट झाली आहे.
गेल्या काही दिवसांत टोमॅटोची आवक दुपटीने वाढली आहे. घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार २०० ते ३०० रुपये असे दर मिळाले आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२० ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यांतून ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. फळभाज्यांची आवक चांगली होत असून बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कर्नाटकमधून मिळून १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, इंदूरमधून १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे : जोरदार पावसात मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात आगमन
पुणे विभागातून सातारी आले ७०० गोणी, टोमॅटो ११ हजार पेटी, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ८ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भुईमूग शेंग, १०० गोणी, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा ६० ट्रक अशी आवक झाली.