राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात येणाऱ्या फलकांवरील ‘लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा’ ही सूचना शनिवारी घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना अमलात आणावी लागणार आहे. पुण्यासाठी हा शनिवार (२८ डिसेंबर) भरगच्च कार्यक्रमांचा, समारंभांचा आणि लग्नांचा असल्यामुळे त्या दिवशी वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा लवकर निघणेच हितकर ठरेल.
काँग्रेसचा स्थापनादिन, कार्यकर्त्यांचा मेळावा, आदिवासी संशोधन संस्थेचा सुवर्णमहोत्सव, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण यासह अनेकविध कार्यक्रम शनिवारी पुण्यात होत आहेत. त्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री व नेते शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या सर्वाच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम दुपारपासून रात्रीपर्यंत असल्यामुळे त्या काळात शहरातील विविध रस्ते बंद राहतील किंवा त्या रस्त्यांवरील वाहतूक वळवली जाईल. महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शनिवारी येत असल्यामुळे त्यांच्या वाहनांचे ताफेही मोठे असतील. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत जागोजागी बदल होईलच.
मार्गशीर्ष महिन्यातील २८ डिसेंबर ही शेवटची लग्नतिथी आहे. त्यामुळे शनिवारी लग्नसोहळेही मोठय़ा प्रमाणात होत आहेत. त्यामुळे त्या गर्दीची व वाहनांचीही भर रस्त्यावरील गर्दीत पडणार आहे.

उद्या कोण, कोण पुण्यात आहेत?
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व अधिकारी.
उद्याचे कार्यक्रम काय आहेत?
काँग्रेस स्थापना दिवस, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, काँग्रेस भवन येथे, दुपारी साडेबारा वाजता.
– आदिवासी संशोधन संस्थेचा सुवर्ण महोत्सव, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत, बालगंधर्व रंगमंदिर येथे, दुपारी चार वाजता.
– राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, राष्ट्रपतींच्या हस्ते, एसएसपीएमएस येथे, सायंकाळी साडेपाच वाजता.
– आम्ही मुळशीकर संस्थेचा सहावा वर्धापनदिन, जीत मैदान, कोथरूड येथे, सायंकाळी सहा वाजता.
– महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, श्री शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ येथे, सायंकाळी सात वाजता.
– काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक, सायंकाळी सातनंतर.
– सर्व मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळे.