पुणे : ‘गो फस्र्ट’ एअरलाइनने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. याचबरोबर कंपनीने पूर्वकल्पना न देता विमान सेवा अचानक बंद केली आहे. याचा फटका पर्यटक आणि त्यांना सेवा पुरवणाऱ्या पर्यटन कंपन्यांना बसला आहे. याबाबत देशभरातील पर्यटन कंपन्यांच्या शिखर संघटनेने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

ट्रॅव्हल एजंट्स असोसिशन पुणे (टॅप) या पर्यटन कंपन्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली. संघटनेचे अध्यक्ष दीपक पुजारी म्हणाले की, पर्यटन व्यवसाय करोना महासाथीमुळे दीर्घकाळ बंद होता. आता कुठे तो पूर्वपदावर येत होता. अनेक जणांनी काही महिन्यांपूर्वी या हंगामातील पर्यटनाच्या योजना आखल्या होत्या. अचानक गो फस्र्टने सेवा बंद केल्याने पर्यटक आणि पर्यटन संस्थांना फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे आमच्या शिखर संघटनेने दाद मागितली आहे.

पर्यटन संस्थांकडून उन्हाळी पर्यटनाचे नियोजन हे सहा महिने आधी केले जाते. त्यासाठी विमान कंपन्या, हॉटेल, स्थानिक सेवा यांसह इतर गोष्टींवर आगाऊ परत न मिळण्यायोग्य पैसे दिले जातात. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे चूक नसतानाही पर्यटन कंपन्यांना पर्यटकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याचवेळी विमान कंपन्यांकडून पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. तिकिटांचा परतावा ग्राहकाला कंपनीच्याच आभासी खात्यात दिला असून, तो कंपनीची तिकिटे पुन्हा खरेदी करण्यासाठी वापरता येतो. विमान कंपनी बंद पडली तर तिची तिकिटे कशी खरेदी करता येतील, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, दादरच्या एका टूर आणि ट्रॅव्हलर्सच्या मालकाने सांगितले की, गो फस्र्टची विमान सेवा बंद झाल्याने प्रवाशांना आम्ही या विमान सेवेचे तिकीट आरक्षित करण्यास नकार देत आहोत.  सध्या आमच्या टूर आणि ट्रॅव्हलर्सने २५ मेचे कोची-मुंबई गो फस्र्ट विमानसेवेचे आरक्षण केले आहे. कुल्र्यातील एका टूर आणि ट्रॅव्हलर्सच्या मालकाने सांगितले की,  सध्या १२ मेपर्यंत गो फस्र्टची विमानसेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यापुढेही ही विमानसेवा बंद राहण्याची शक्यता आहे. सध्या आमच्याकडे एकही गो फस्र्ट विमानसेवेचे आरक्षण नाही.

गो फस्र्टचे म्हणणे..

कार्मिक कारणांमुळे १२ मे २०२३ पर्यंतची गो फस्र्टची उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगीर आहोत. उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर परिणाम झाला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यास तयार आहोत. प्रवाशांना मूळ पेमेंट मोडद्वारे रकमेचा पूर्ण परतावा देण्यात येत आहे. प्रवाशांना काही अडचण असल्यास ग्राहक क्रमांकाशी संपर्क साधावा.

संघटनेच्या मागण्या

* ‘गो फस्र्ट’च्या या हंगामातील मार्गावर इतर कंपन्यांना सेवा देण्याचे आदेश द्यावेत.

*पुढील दोन महिने विमान तिकिटांच्या किमतीवर मर्यादा आणून प्रवाशांची लूट टाळावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* ‘गो फस्र्ट’ने तिकिटाचा परतावा थेट आभासी खात्यात न देता थेट पर्यटन कंपन्यांच्या बँक खात्यात द्यावा. * सहल रद्द झाल्यास पर्यटन कंपन्यांना परतावा देण्याचे हॉटेल व इतर सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना निर्देश द्यावेत.