पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पालखी सोहळ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या हडपसर ते दिवेघाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आज (मंगळवार १६ सप्टेंबर) या मार्गावर नियंत्रित स्फोट (ब्लास्टिंग) घडवून आणण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, तरी प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
पालखी महामार्गाच्या (एनएच ९६५) रुंदीकरण प्रकल्पाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आळंदी-पंढरपूर महामार्ग विकास योजनेअंतर्गत (भारतमाला परियोजना) पॅकेज ६ अंतर्गत रॉक्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स मोहोळ हायवे प्रा. लि. या कंपनीद्वारे या महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीकरणाचे काम केले जात आहे.
दिवेघाट हा पालखी सोहळ्याच्या मार्गातील अत्यंत कठीण भाग आहे, जिथे डोंगराळ भाग आणि वळणावळणांचा घाट रस्ता असून खड्डे आणि उंचावरील रस्ता वारकऱ्यांसाठी नेहमीच आव्हान ठरतो. या प्रकल्पामुळे मार्गाची रुंदी १० मीटरपर्यंत वाढवली जाणार असून, पालखी सोहळ्यावेळी लाखो वारकऱ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास शक्य होईल.
महामार्ग प्राधिकरणाचे ब्लास्टिंगचे काम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली असून, पर्यायी वाहतुकीचे नियोजन केले आहे. पुणे-सातारा आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून कात्रज-बोपदेव घाट मार्गे सासवड (राज्य महामार्ग १३९), कापुरहोळ-नारायणपूर मार्गे सासवड (राज्य महामार्ग ११९), हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे मार्गे सासवड (राज्य महामार्ग ६१) आणि खेड शिवापूर-सासवड जोड रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकल्पामुळे पालखी महामार्गाची एकूण लांबी १६० किलोमीटरपर्यंत विस्तारित होईल, ज्यामुळे वारकरी आणि सामान्य प्रवाशांचा प्रवास सुकर होईल, महामार्गावर सोयी-सुविधा वाढतील, असा दावा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.