खडकवासला धरण साखळीत सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले असून नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील रस्त्यावर पाणी असल्याने मध्यभागातील नारायण पेठ, शनिवार पेठ तसेच डेक्कन जिमखाना भागात वाहतूक कोंडी झाली.

नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पुलाचा वापर मोठ्या संख्येने वाहनचालक करतात. कोथरुड, कर्वेनगर तसेच सिंहगड रस्त्याकडे जाणारे दुचाकीस्वार नदीपात्रातील रस्त्याचा वापर पर्यायी रस्ता म्हणून करतात. नदीपात्रातील रस्ता, भिडे पूल गेले दोन दिवस पाण्याखाली असून त्यामुळे मध्यभागातील केळकर रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ तसेच डेक्कन जिमखाना, आपटे रस्ता परिसरात वाहतूक कोंडी आहे. शनिवारी (१३ ऑगस्ट) मध्यभागातील पेठांसह जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसरात कोंडी झाली होती. खड्डे तसेच मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्ड्यातून वाट काढत वाहनचालक जात होते. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चाैक, संभाजी पूल परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पावसाने उघडीप दिली असली तरी नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्याने गेले दोन दिवस मध्यभागात मोठी कोंडी होत आहे.