पाण्याखाली गेलेला भिडे पूल, बंद असलेले नदी काठचे रस्ते व अण्णा भाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकांसाठी वळविलेल्या वाहतुकीच्या एकत्रित परिणाम म्हणून गुरुवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची मोठय़ा प्रमाणावर कोंडी झाली होती. अनेकांची वाहने या कोंडीमध्ये अडकून पडल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
संध्याकाळी सहानंतर प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणावर वाहने रस्त्यावर येत असतात. त्याच वेळेला विविध भागामध्ये वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. स्वारगेटला जोडणाऱ्या विविध रस्त्यांबरोबरच जंगली महाराज रस्ता व फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावर प्रामुख्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी सहाच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली. तशीच परिस्थिती फग्र्युसन रस्त्यावरही निर्माण झाली होती.
जंगली महाराज रस्त्यावरील वाहनांची रांग संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास थेट बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत व नंतर थेट शिवाजीनगर गावठाणपर्यंत जाऊन पोहोचली. दोन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी असल्याने वाहनचालक त्यांच्या जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहने काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांना जोडणारा घोले रस्ता व आपटे रस्त्याबरोबरच सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. संध्याकाळी कामाहून घरी जाणारे अनेक जण या कोंडीमध्ये अडकले होते. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी याबाबत सांगितले, की भिडे पूल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा भार जंगली महाराज रस्त्यावर आला. त्याचप्रमाणे अण्णा भाऊ साठे जसंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांसाठी स्वारगेट भागातून विविध रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक शाखेचे बहुतांश कर्मचारी रस्त्यावर उतरवून परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.