पुणे : शालेय साहित्य खरेदीसाठी, तसेच संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याने शनिवारी दिवसभर मध्य भागात कोंडी होऊन बहुतांश रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
सोमवारपासून (१६ जून) शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी सकाळपासून अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये गर्दी झाली. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरांतून मोठ्या संख्येने पालक मुलांबरोबर आले. अप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील हुतात्मा चौक (बुधवार चौक) भागात यामुळे गर्दी झाली. संकष्टी चतुर्थी असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. परिणामी, वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. अप्पा बळवंत चौकाकडून हुतात्मा चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या भागातील वाहतूक बाजीराव रस्त्यामार्गे वळविण्यात आली.
पाऊस असल्यामुळे अनेक जण मोटारीतून मध्य भागात आले होते. त्यामुळे कोंडीत भर पडली. बाजीराव रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक खरेदीदारांनी सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेतील अरुंद रस्त्यांवर दुचाकी लावल्या होत्या. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने लक्ष्मी रस्ता, गणेश रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. मध्य भागातील अरुंद रस्त्यांवरून चालणेदेखील अवघड झाले.
शालेय साहित्यखरेदी, तसेच संकष्टी चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने नागरिक मध्य भागात आले होते. वाहतूक नियोजनासाठी मध्य भागातील प्रमुख चौकांत वाहतूक पोलीस तैनात होते. – संगीता जाधव, पोलीस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक विभाग.