पुणे : गणेशोत्सवात विविध मंडळांसमोर दररोज सायंकाळी ढोल ताशा पथकांकडून स्थिर वादन सादर करण्यात येत आहे. स्थिर वादनामुळे चौकाचौकात कोंडी होत असून भाविकांची गैरसोय होत आहे.

स्थिर वादनाच्या नावाखाली तासभर रस्ता अडवून ठेवल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदाच्या उत्सवावर कोणतेही निर्बंध नाहीत. दोन वर्षांच्या खंडानंतर उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. भव्य दिव्य देखावे, विद्युत रोषणाई साकारणाऱ्या मंडळांच्या परिसरात गर्दी होत आहे. गर्दीत दररोज सायंकाळी उत्सव मंडपासमोर ढोल ताशा वादन करणाऱ्या पथकांना आमंत्रित केले जात आहे. शहर तसेच उपनगरातील चौकाचाैकात दररोज सायंकाळी ढोल ताशा पथकांकडून स्थिर वादन करण्यात येत आहे. स्थिर वादन सुरू होण्यापूर्वी उत्सव मंडपासमोरील रस्ता बंद करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड : भोसरी MIDC तील ३०५ उद्योग वीजेविना बंद ; ८० कोटींचे नुकसान

दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत विविध भागात स्थिर वादन करण्यात येत असल्याने भाविकांना गर्दीतून वाट काढणे अवघड होत आहे. रस्ता बंद केल्याने वाहनचालकांना मनस्तापाला समोरे जावे लागत आहे, ढोल ताशांच्या दणदणाटामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. चौकातील रस्ता बंद केल्याने भाविकांची गैरसोय होत आहे, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून उत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी ढोल ताशा पथकांकडून स्थिर वादन सादर करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

हेही वाचा… पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबतचा अहवाल गुरुवारी सादर होण्याची शक्यता ?

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उत्सवातील गर्दीचे नियाेजन करण्यासाठी मध्यभागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ढोल ताशा पथकांकडून सादर करण्यात येणाऱ्या स्थिर वादनासाठी संपूर्ण रस्ता बंद करणे योग्य नाही. भाविक तसेच वाहनचालकांसाठी रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्थिर वादनाबाबत स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. – प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक