पुणे : पुण्यातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहाचा उच्चांक गाठला. परंतु, २४ तासांहून अधिक काळ लांबलेल्या या मिरवणुकीमुळे शहरातील मध्यवर्ती भागांतील रस्त्यांवर रविवारी सकाळी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मिरवणुकीनंतर परतीच्या मार्गावर निघालेल्या गणेश मंडळांंच्या देखाव्यांच्या गाड्यांमुळे केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांचा वापर केल्याने वाहतुकीवर ताण पडला. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांची दमछाक झाली. रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यांवर अशी परिस्थिती असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
अनंत चतुर्दशीला सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक रविवारी सायंकाळपर्यंत चालली. विसर्जन करून परतताना मध्यवर्ती पेठांमधून आणि प्रमुख रस्त्यांवरून गणेश मंडळे मार्गस्थ झाली. विशेषतः केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर मंडळांच्या परतीच्या मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाली. फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरही तीच परिस्थिती होती. ‘प्रत्येक वर्षी मिरवणूक लांबते. यंदा विसर्जनानंतर कोंडी जास्त जाणवली,’ असे स्थानिक रहिवासी राहुल कुलकर्णी यांनी सांगितले.
यापुढे मिरवणुकीचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी पोलिस आणि मंडळांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक नियोजनात बदल करण्यात आले होते. परंतु परतीच्या मार्गावरील गणेश मंडळांच्या रथांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलीस, कर्मचाऱ्यांची नेमणूक करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.- हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा