महत्प्रयासाने मिळविलेल्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर वाहतुकीच्या कोंडीचा फटका पुणेकरांना बसला. सभेनंतर गर्दीचा लोंढा आल्यामुळे महाविद्यालयाच्या टिळक रस्तावरील प्रवेशद्वारावर प्रचंड ताण आला. जवळपास तासभर टिळक रस्ता परिसराला वाहतुकीच्या कोंडीने ग्रासले होते.
टोलसंदर्भातील आंदोलनानंतर राज ठाकरे गेल्या रविवारी पुण्यामध्ये पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, त्यांचा शुभ आकडा असलेल्या ९ फेब्रुवारीला जाहीर सभेमध्येच बोलेन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या रविवारच्या सभेविषयी सर्वांमध्येच प्रचंड उत्सुकता होती. त्याला सभेच्या जागेच्या वादाची फोडणी मिळाली. एका अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात असल्याने कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये औत्सुक्य होते. राज ठाकरे यांच्या सभेनंतर लोकांना महाविद्यालयाच्या मैदानातून बाहेर पडणे मुश्कील झाले होते. सर्वाना मुख्य प्रवेशद्वाराने बाहेर जायचे असल्याने टिळक रस्त्यावर प्रचंड ताण आला. एकाच वेळी अनेक जण बाहेर पडू लागल्याने टिळक रस्ता अपुरा पडू लागला. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी ‘नागरिकांनी वाहतुकीसाठी टिळक रस्त्याचा वापर टाळावा’, असे आवाहन पुणेकरांना केले होते. मात्र, गर्दीवर नियंत्रण आणण्यामध्ये पोलिसांचे मनुष्यबळदेखील अपुरेच पडले. वाहतूक थोपवून धरल्यामुळे अनेक जण तासभर जागीच ळिखून राहिले होते.