scorecardresearch

पुणे: हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा पोलिसांना विसर; जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात घट

पुण्यात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीची कारवाई थंडावली आहे. चालू वर्षात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कारवाईत मोठी घट झालेली आहे.

traffic police helmate ban
हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा पोलिसांना विसर(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

संजय जाधव

पुण्यात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीची कारवाई थंडावली आहे. चालू वर्षात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कारवाईत मोठी घट झालेली आहे. त्यातही वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारेच प्रामुख्याने ही कारवाई सुरू आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांकडून कारवाईचे प्रमाण नगण्य आहे.

शहरात घडणारे अपघात हे प्रामुख्याने दुचाकी आणि पादचारी यांच्याशी निगडित आहेत. अपघातांमध्ये जीव गमावावा लागणाऱ्यांमध्येही दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते. चालू वर्षातील जानेवारी महिन्याची आकडेवारी पाहिल्यास हेल्मेटसक्तीची कारवाई वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र, फेब्रुवारीपासून त्यात घट सुरू झाली. मार्चमध्येही ही कारवाई मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे.

हेही वाचा >>>पुणे: विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने तरुणीची आत्महत्या; ‘एनडीए’तील जवानाविरुद्ध गुन्हा

वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर प्रत्यक्ष होणारी कारवाई अतिशय कमी आहे. वाहतूक पोलिसांकडून प्रामुख्याने सीसीटीव्हीद्वारे कारवाई केली जात आहे. जानेवारी महिन्यात हेल्मेटसक्तीची कारवाई ७२ हजार ६६८ जणांवर करण्यात आली. यात सीसीटीव्हीद्वारे केलेली कारवाई जास्त असून, प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी केवळ १४ जणांवर कारवाई केली. एकूण कारवाई केलेल्यांपैकी ४ हजार ६४६ जणांनी दंड भरला.

फेब्रुवारी महिन्यात हेल्मेट कारवाईचा आकडा २४ हजार ३६१ वर आला. जानेवारीचा विचार करता फेब्रुवारीतील कारवाई केवळ ३० टक्केच आहे. त्यात रस्त्यांवर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून केवळ २२ जणांवर कारवाई केली असून, उरलेली सर्व कारवाई सीसीटीव्हीद्वारे करण्यात आली आहे. त्यातही दंड भरणाऱ्यांची संख्या १ हजार ६१ आहे. १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत केवळ १३ हजार ४०१ जणांवर हेल्मेटसक्तीची कारवाई केली आहे. त्यातही रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी ३२ जणांवर केलेली कारवाई वगळता सर्व कारवाई सीसीटीव्हीद्वारे झालेली आहे. एकूण कारवाईपैकी फक्त ३०३ दुचाकीस्वारांनी दंड भरला आहे.

हेही वाचा >>>पुणे: ससून रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीची आत्महत्या; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

आरटीओकडून कारवाई जोरात

पोलिसांकडून कारवाई कमी झालेली असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मात्र हेल्मेटसक्तीची जोरदार कारवाई सुरू केली आहे. आरटीओच्या तपासणी पथकांनी १ ते २३ मार्च या कालावधीत ७५० हून अधिक वाहनचालकांवर हेल्मेटची कारवाई केली आहे. या काळात पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर केलेल्या कारवाईचा आकडा केवळ ३२ आहे.

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
जानेवारी : ७२,६६८
फेब्रुवारी : २४,३६१
१ ते २४ मार्च : १३,४०१

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 19:06 IST

संबंधित बातम्या