पुणे : शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सेवेला बसला आहे. ‘पीएमपी’ची सेवा कूर्मगतीने सुरू असल्याने प्रवाशांना नियोजित ठिकाणी, कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत आहे. मेट्रो सेवा मात्र नियोजित वेळेनुसार धावत आहे.

शहरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस असून, रविवारपासून जोर वाढला आहे. त्यातच पुणे महानगरपालिकेकडून अद्यापही पावसाळ्यापूर्वीची नियोजित कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, नालेसफाई, भूमिगत मलनिस्सारण वाहिन्यांची कामे सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, मध्यवर्ती पेठा, येरवडा, औध, बाणेर, कोथरूड, विश्रांतवाडी, घोरपडी, आणि इतर भागांत पाणी साठत आहे. या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू असचाना पावसाला सुरुवात झाल्याने दुरुस्तीच्या ठिकाणीही पाणी साठले आहे. सिंहगड रस्ता, हिंजवडी, टिळक रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता या ठिकाणी मंगळवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वाहतूक कोंडीमुळे ‘पीएमपी’चा वेग मंदावला असला, तरी पीएमपीच्या दैनंदिन फेऱ्या सुरू आहेत. उपनगरांत काहीशा अडचणी येत असल्याने तेथे बसला तात्पुरता विलंब होत आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) वेळापत्रकात कुठलाही फरक झाला नसून, नियोजित वेळापत्रकानुसार मेट्रो धावत असल्याची माहिती ‘महामेट्रो’कडून देण्यात आली.

पावसामुळे वाहतूक मंदावली असल्याने पीएमपीचा वेग काहीसा मंदावला असला, तरी मार्गिकांवरील संचलन सुरू ठेवण्यात आले आहे. मध्यवर्ती भागांत आणि उपनगरीय भागांत वाहतूक कोंडीचा परिणाम जाणवतो.- सतीश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक (संचलन), पीएमपीएमएल

पावसामुळे मेट्रोच्या रुळांवर पाणी साचणे किंवा मार्गिका रद्द करणे असे प्रकार घडू नये, म्हणून काळजी घेण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार मेट्रोच्या फेऱ्या सुरू आहेत.- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो, पुणे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज दुपारी महानगरपालिकेपासून औंधला जाण्यासाठी पीएमपीत बसलो. दीड तासाने औंधला पोहोचलो. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आणि बसमध्ये आसन उपलब्ध नसल्याने ताटकळत उभे राहावे लागले.- श्रीकांत वाघ, प्रवासी