लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सामान्यांची फसवणूक करण्यासाठी चोरटे नवनवी शक्कल लढवत असतात. सायबर चोरट्यांनी आता वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश तयार केला असून, बनावट संदेश समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. वाहनचालकांनी अशा प्रकारच्या संदेशास प्रतिसाद देऊ नये, तसेच चोरट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सायबर चोरटे नागरिकांनी फसवणूक करण्यासाठी नवनवी शक्कल लढवितात. समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, स्वस्तात दुचाकी, गृहोपयोगी वस्तू विक्री, ऑनलाइन टास्क, नोकरीचे आमिष दाखवून चोरटे नागरिकांना जाळ्यात ओढतात. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. चोरट्यांनी नेमकी ही बाब हेरून आता वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक नियमभंग दंडाच्या संदेशात सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली आहे. या लिंकमधील शब्दात फेरफार करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-पुणे: उपाहारगृहातील बिलावरुन वाद कामगारांकडून ग्राहकांना मारहाण

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले, ‘थकीत दंडाचा अधिकृत संदेश पोलिसांकडून पाठविण्यात येतो. या संदेशात छायाचित्र नसते. चोरट्यांनी संदेशात लिंक पाठविली आहे. या लिंकमधील शब्दात फेरफार करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये.’

सायबर चोरटे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करतात. समाजमाध्यमातील संदेशावर विश्वास ठेऊ नये, असे सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी नमूद केले.

आणखी वाचा-राखी पौर्णिमेला पोलिसांची अनोखी भेट; दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायबर चोरट्यांनी थकीत दंडाचा बनावट संदेश प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबतची माहिती सायबर गुन्हे शाखेला कळविण्यात आली आहे. नागरिकांनी बनावट संदेशाला प्रतिसाद देऊ नये. असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी. -विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा